बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | देशात सुरु होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सातत्याने प्रयोग केले गेले. मात्र, हा आगामी काळात होत असलेल्या महत्त्वाच्या स्पर्धांसाठीच्या नियोजनाचाच भाग आहे, असे मत रवींद्र जडेजा याने व्यक्त केले आहे. येत्या 30 ऑगस्टपासून आशिया करंडक तर 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा सुरू होणार आहे. आशिया करंडक स्पर्धा व विश्वकरंडक स्पर्धांसाठी प्लेइंग इलेव्हन आधीच निश्चित करण्यात आले आहे.
या स्पर्धांपूर्वी ज्या मालिका होत आहेत त्यातच आम्ही प्रयोग करू शकतो. आम्ही नवीन संघ समतोल वापरून पाहू शकतो. यामुळे आम्हाला मोठ्या स्पर्धांमध्ये लाभ होणार आहे. यातून संघाची ताकद आणि कमकुवतपणा समोर येणार आहे. प्रयोगांमुळे आम्ही सामने गमावले असे नाही. आम्ही विविध नियोजनचा प्रयत्न करत आहोत. युवा खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय अनुभवाची गरज आहे, असेही जडेजा म्हणाला.
वेस्ट इंडिज दौऱ्यात आता भारतीय संघाला पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर संघ आयर्लंड दौऱ्यावर टी-20 मालिका खेळणार आहे. आयर्लंडनंतर भारत या महिन्याच्या अखेरीस सुरू होणारी आशिया करंडक स्पर्धा खेळणार आहे. त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळायची आहे. भारतीय संघाला 2013 सालानंतर आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा भारतातच एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होत असून 2011 सालच्या स्पर्धेची पुनरावृत्ती यंदा होणार का, व भारतीय संघ गेल्या दहा वर्षांचा आयसीसी स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2013 साली भारताने आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. त्यानंतर आयसीसीच्या स्पर्धेत भारताला यश मिळालेले नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम