राजकारण तापल :शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर मध्यरात्री हल्ला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ |  मुंबई जवळ असलेल्या वर्सोवा येथून आपल्या कारने शिवसेना (शिंदे गटा)चे अंधेरी विभागाचे प्रमुख अल्ताफ पेवकर जात असतांना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काल सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्ताफ पेवकर वर्सोवा येथून आपल्या कारने घरी निघाले असताना, हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बॅटच्या सहाय्याने अल्ताफ पेवकर यांच्या कारची काच फोडली. तसेच त्यांना मारहाण देखील केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हा हल्ला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अल्ताफ पेवकर यांनी केला आहे. दरम्यान, अल्ताफ पेवकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शिंदे गटाचे कार्यकर्ते वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या घटनेमुळे वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले होते. ते अंधेरी पश्चिमेकडील मॉडेल टाउन परिसरात त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी हातात असलेल्या बॅट आणि हॉकीस्टिकने अल्ताफ यांच्या कारची काच फोडली. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधलेला असल्यामुळे त्यांना ओळखता आलं नाही. दरम्यान, हा हल्ला कोणी केला? राजकीय वर्चस्व वादातून हा हल्ला झाला का? याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम