चार संघांत स्थान मिळविण्यासाठी सात संघांमध्ये शर्यत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मे २०२३ ।  जसजसा शेवटच्या टप्प्यात आयपीएलचा संघर्ष पोहोचतोय तसतसा प्ले ऑफचा संघर्षही अटीतटीचा होत चाललाय. काल मुंबईने पंजाबचा पराभव केल्यामुळे आता अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी सात संघांमध्ये शर्यत रंगेल हे स्पष्ट झालेय. तसेच अव्वल चार संघांचे भवितव्य नेट रनरेटच ठरवणार असल्यामुळे सध्या गटात अव्वल असलेला गुजरातही बाहेर फेकला जाऊ शकतो तर सातव्या क्रमांकावर असलेली मुंबई अव्वल स्थान पटकावू शकते.

काल चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामना पावसाने जिंकल्यामुळे या दोन्ही संघांना एक गुण गमावल्याचे दुःख शेवटपर्यंत सतावणार हे निश्चित झालेय. सध्या संघांमध्ये असलेली चुरस आणि अनपेक्षित लागणाऱ्या निकालानंतरही जो संघ किमान 9 सामने जिंकेल तोच थेट अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी क्वालिफायर सामना खेळू शकेल. तिसरे आणि चौथे स्थान मिळविणारे संघही नेट रनरेटच्या आधारावर ठरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आव्हान जिवंत असलेल्या सातही संघांसाठी एकेक धाव आणि एकेक चेंडू महत्त्वाचा ठरणार आहे.

आयपीएलचे टॉप फोर…
आयपीएलमध्ये आजवर नऊ सामने जिंकणारे संघच टॉप फॉरमध्ये असतात. गेल्या मोसमात गुजरातने दहा सामने जिंकले होते आणि सध्या तोच एकटा सहा सामने जिंकला आहे. त्यामुळे टॉप फोरमध्ये येण्यासाठी इतर सहाही संघांना आपल्या उर्वरित सर्व लढती जिंकाव्या लागणार आहेत, पण हे संघांना शक्य होणार नाही. त्यामुळे टॉप फोरचे भवितव्य विजयापेक्षा नेट रनरेटवर ठरण्याची अधिक शक्यता आहे.

कुणीही दावेदार नाही…
गुजरात अव्वल स्थानावर असला तरी तो अव्वल चार संघांत असेल याची खात्री नाही. आयपीएलमध्ये किमान 9 किंवा 10 सामने जिंकणाराच संघ टॉप फोरमध्ये असतो. जर गुजरातला दोन-तीन पराभवाचे धक्के बसले तर त्यांचे अव्वलच स्थान नव्हे तर टॉप फोरमधील स्थानही जाऊ शकते. यावेळी सात संघ जवळजवळ एकाच रेषेत धावत असल्यामुळे सातत्यपूर्ण विजय कोणत्या संघाला अव्वल स्थान मिळवून देईल, हे अनिश्चित आहे. त्यामुळे क्वालिफायर संघ कोणता असेल आणि एलिमिनेटर संघ म्हणून कुणाला संधी मिळेल, हे जवळजवळ नेट रनरेटवरच ठरणार आहे.

दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाताचे आव्हान संपुष्टात
दिल्ली आणि कोलकाताने 9 पैकी 6 सामने गमावले आहेत. आयपीएलच्या अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी किमान 9 सामने जिंकणे आवश्यक असते, असे चित्र आहे आणि या दोन संघांचे प्रत्येकी 5 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे हे संघ स्पर्धेतून खऱ्या अर्थाने बाहेर झाले आहेत. केवळ ते जर तरमुळे स्वतःला अजूनही संधी असल्याचे मानत आहेत, पण हे अशक्य आहे. तसेच हैदराबादसाठी अंधूक आशा आहे. जर त्यांचा संघ सहापैकी सहा सामने जिंकण्याचा पराक्रम करतो तर ते अंतिम चारमध्ये दिसू शकतात. सध्या त्यांचा संघ असा चमत्कार घडविण्याच्या स्थितीत नाही, हे कुणीही सांगू शकतो.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम