चित्ते आले, मग रोजगार का नाही? राहुल यांचा मोदींना प्रश्न
दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । भारतातून विलुप्त झालेले चित्ते हे तब्बल ७ दशकांच्या कालावधीनंतर मायदेशी परतले असताना देशात सध्या या विषयावरून राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेश येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणण्यात आलेले ८ चित्ते मोदींच्या हस्ते अभयारण्यात सोडण्यात आले. मोदींनी हे आठ चित्ते भारतात आल्याच्या क्षणांची छायाचित्रे टिपली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केले आहे.
याबाबत भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून “आठ चित्ते तर आले, पण आता हे सांगा ८ वर्षांमध्ये १६ कोटी रोजगार का नाही आले?” असा खोचक प्रश्न करीत पंतप्रधान मोदी व भाजपवर घणाघाती टीकाही केली आहे.
काय म्हणाले होते मोदी?
“हे दुर्दैव आहे की, १९५२ साली देशातून चित्ते विलुप्त झाल्याची घोषणा झाली, पण गेल्या अनेक दशकांपासून चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होण्यास सुरुवात होत आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण झाले की, विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात आणि आपले भविष्यही सुरक्षित राहते. जेव्हा कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम