राज ठाकरेंचे आवाहन : जीव पणाला लावू नका !
बातमीदार | १ नोव्हेबर २०२३
आपल्याकडील राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवे आहे. ते एकदा मिळाले हे आपली सगळी आश्वासने विसरणार, अशी राजकीय पक्षांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात, त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणे योग्य नाही. त्यामुळे तुमचे उपोषण तुम्ही तत्काळ थांबवा. तब्येत जपा, कारण आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे, अशी विनंती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केली आहे.
राज ठाकरे यांनी जरांगे-पाटील यांना ‘एक्स’द्वारे पत्र लिहून हे आवाहन केले आहे. या पत्रात म्हटले आहे की आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. अशा प्रश्नांना हात घालण्याची येथील राज्यकर्त्यांची इच्छा नाही. फक्त जातीच्या नावाने मते मागायची, खोटी आश्वासने द्यायची, असे यांचे उद्योग, तरीही आपण भाबडेपणाने यांना मतदान करतो. ही माणसे फार निष्ठुर आहेत. निगरगट्ट आणि असंवेदनशील सरकारसाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची बाजी लावू नका. असे आवाहनही राज यांनी यानिमित्ताने केले. तुमच्या या कामात मी आणि माझा मनसे पक्ष सोबत आहोतच, अशी ग्वाही राज यांनी जरांगेंना दिली.
आरक्षणासाठी आता गावागावांतील तरुण आत्महत्या करत आहेत. हे फारच क्लेषदायक आहे. या आंदोलनातून घनघोर निराशा पसरणे अत्यंत वाईट आहे. समाजा समाजात विद्वेष पसरू नये याची काळजी घ्यावी लागेल. जातीपातीतले द्वेषाचे राजकारण आपल्या भविष्यातील पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही, याची आपण सर्वांनी आताच काळजी घेणे महत्त्वाचे आहे, अशी कळकळीची विनंतीही राज यांनी जरांगे-पाटील यांना केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम