राजदरबारी टोल मुद्यावर निघणार मार्ग !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून मनसे टोल मुद्यावर आक्रमक झाली असतांना नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी ठाकरे यांनी टोल वसूली बंद करा, नसता टोल नाके जाळून टाकू, असा स्पष्ट इशाराच राज्य सरकारला दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक थेट राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बैठकीला उपस्थित असल्याने राज ठाकरे यांच्या निवासाबाहेरील पोलिस सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काल राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता निर्णय होतो, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे, मंत्री दादा भुसे आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले, याची माहिती देखील ते माध्यमांना देणार आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काल झालेल्या बैठकीत टोल माफ करण्याची मागणी केली आहे. या चर्चेत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांसंबंधित अनेक प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले आहेत. तसेच टोलनाक्यांवरील शौचालय आणि अस्वच्छता याकडे देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील एका सोसायटीचा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला आहे. या सोसायटीतील रहिवाशांसाठी टोल देऊनच त्यांच्या सोसायटीमध्ये जावे लागत असल्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम