राम रहीम पुन्हा ४० दिवस तुरुंगाबाहेर !
दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । अत्याचार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. तो रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पॅरोलची बातमी मिळताच आश्रमात स्वागताची तयारी सुरू झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी 14 ऑक्टोबरला गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. त्याच्या पॅरोलची मुदत २५ नोव्हेंबरला संपली होती. पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशातील आपल्या बरनवा आश्रमात गेला होता. हरियाणाचे तुरुंगमंत्री रणजितसिंह चौटाला यांनी डेरा प्रमुखाच्या ताज्या पॅरोल अर्जावर भाष्य करताना सांगितले होते की, डेरा प्रमुखाने ४० दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता, जो रोहतक विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरोलच्या कालावधीत डेरा प्रमुख 25 जानेवारी रोजी माजी डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांच्या जयंती सोहळ्याला ही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्या शेवटच्या पॅरोल कालावधीत डेरा प्रमुखाने यूपीच्या बरनवा आश्रमात अनेक ऑनलाइन सत्संग आयोजित केले होते. हरयाणातील भाजप नेतेही त्यावेळी उपस्थित होते. ऑक्टोबर पॅरोलपूर्वी डेरा प्रमुख जूनमध्ये एका महिन्याच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम