पतीच्या कामाची पावती आज मिळाली ; ऋतुजा लटके
दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । अंधेरी पोटनिवडणुकीतून प्रमुख विरोधीपक्ष भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्यात जमा आहे. सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानते. पती रमेश लटके यांचे काम आणि त्यांचे सर्वांशी असणारे सहकार्याचे आणि जिव्हाळ्याचे नाते, यामुळे मला हा आशीर्वाद मिळाला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिली.
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी भाजपने माघार घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपची आज सकाळी बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप ही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली.
काय म्हणाल्या लटके?
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल, त्यांचे सर्वांशी असणारे सहकाराचे नाते. यामुळे आज मला हा आशीर्वाद मिळाला. सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत होते. सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. माझ्या पतींनी नेहमी जनसेवा केली. माझाही ध्यास अंधेरीचा विकास हाच असेल. भाजपचेही मी आभार मानते. सर्वांचे आशीर्वाद आहेत. माझ्या पतीचे ध्येयच समोर घेऊन जाईन. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मी आशीर्वाद घेईन.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम