केंद्रीय कर्मचाऱ्याना दिलासा : महागाई भत्यात वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३

येत्या महिन्याभरावर दसरा व दिवाळी या सणांच्या तोंडावर केंद्र सरकारने आपले कर्मचारी व पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (डीए) ४ टक्क्यांनी वाढवण्याचा दिलासादायक निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा ४८.६७ लाख कर्मचारी व ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या ७८ दिवसांच्या पगाराइतकाच बोनस मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा रेल्वेच्या ११.०७ लाखांहून अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या वेळी घेण्यात आलेल्या निर्णयांचा तपशील माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना सांगितला. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्या आला. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना ४६ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर १२ हजार ८५७ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. महागाई भत्ता गेल्या १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे. महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार घेण्यात आला, असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. नवरात्री, दसरा व दिवाळीच्या काळात महागाई भत्ता वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. महागाई भत्ता वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. वर्ष २०२३ करता केंद्र सरकारने डीए वाढवण्याची पहिली दुरुस्ती केली.

त्यानंतर, २४ मार्च २०२३ रोजी ३८ वरून ४२ म्हणजेच ४ टक्क्यांनी डीए वाढवण्यात आला. हा निर्णय १ जानेवारी २०२३ पासून लागू झाला. दुसरीकडे, केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ७८ दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य बोनस देण्यास मंजुरी दिली, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या निर्णयाचा फायदा आरपीएफ व आरपीएसएफवगळता ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, सुपरवायझर, टेक्निशियन, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि इतर ग्रुप ‘सी’ च्या ११ लाख ७ हजार ३४६ कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस दिल्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार १,९६८ कोटी रुपयांनी वाढल्याचे ठाकूर म्हणाले. रेल्वेने १५०९ दशलक्ष टन माल व ६५० कोटी प्रवासी वाहतूक केल्याची बाब ठाकूर यांनी अधोरेखित केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम