रोहित शर्माने केला शतके झळकावण्याचा विक्रम !
बातमीदार | १२ ऑक्टोबर २०२३
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी शतक झळकावून विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केले. रोहितने ८४ चेंडूंत १३१ धावांच्या खेळीत १६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याला २६ व्या षटकात राशिद खानने त्रिफळाचीत केले.
रोहितने विश्वचषकातील सातवे शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तेंडुलकरने सहा विश्वचषकांमध्ये (१९९२ ते २०११) सहा शतके झळकावली होती, तर रोहितचा हा तिसरा ( २०१५, २०१९, २०२३) एकदिवसीय विश्वचषक आहे. त्याचप्रमाणे रोहितने विश्वचषकात भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद अर्थात ६३ चेंडूंत शतक झळकावले. याआधी, विश्वचषकात भारतीयांमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम कपिल देवच्या नावावर होता. कपिल देवने १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या १७५ धावांच्या ऐतिहासिक खेळीत ७२ चेंडूत शतक झळकावले होते. भारतीय कर्णधाराने विश्वचषकातील सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. १९ डावांत हा आकडा गाठून त्याने डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली. सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स यांनी २० डावांत धावा पूर्ण केल्या होत्या. या सलामीच्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी ख्रिस गेलने ४८३ सामन्यांमध्ये ५५३ षटकार ठोकले होते. रोहितने ही कामगिरी ४५३ व्या डावात केली आहे.
सचिन तेंडुलकर (४९) आणि विराट कोहली (४७) यांच्यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितच्या (३१) नावाची नोंद झाली आहे. सलामीवीर म्हणून रोहितचे हे २९ वे शतक असून त्याने या कामगिरीत श्रीलंकेचा सलामीवीर दिग्गज सनथ जयसूर्या (२८) याला मागे टाकले आहे. या यादीत तेंडुलकर (४५) च्या नावावर सर्वात जास्त शतके आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम