शिंदे- फडणवीस एकत्र ; चर्चेला मिळाला पूर्णविराम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  राज्यात गेल्या दोन दिवसापासून शिंदे व फडणवीस यांच्यात वाद पेटला असल्याची अनेक विरोधकांनी चर्चा सुरु केल्या होत्या. त्या चर्चा देखील एका जाहिरातीवरून झाल्या होत्या पण लागलीच शिंदे गटाने दुसऱ्या दिवशी नवीन जाहिरात प्रसिद्ध करीत आमच्यात कुठलाही वाद नाही, असे सांगितले होते. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र आल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. एका जाहिरातीमुळे काही होईल एवढी शिंदे गट व भाजपची युती तकलादू नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिंदे गट व भाजप यांच्यात जाहिरातीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज असून युतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. अशात आज पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज मुंबईहून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने एकत्र पालघरला आले. याचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी हेलिकॉप्टरने पालघरला उतरलो तेव्हा मला पत्रकारांनी विचारले शिंदेंसोबत प्रवास करून कसे वाटत आहे. त्यावर मी म्हणालो, आमचा एकत्र प्रवास आताचा नव्हे तर गेल्या 25 वर्षांपासूनचा आहे. गेल्या वर्षभरात आमचा प्रवास आणखी घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासची चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ एका जाहिरातीमुळे किंवा एखाद्या वक्तव्यामुळे आमच्यात काही बिनसेल एवढे तकलादू आमचे सरकार नाही. पहिले भाषण कुणी करायचे, यावरून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही नाही. एखादे पद मिळवण्यासाठी, वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केलेले नाही. तर, सर्वसामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. विशेष म्हणजे आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला. शिंदेसेनेने दिलेल्या जाहिरातीत शिंदे हे फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा उल्लेख होता. त्यामुळेच शिंदे गट व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे आज भाषणात फडणवीसांनीच शिंदेंचा ‘लोकप्रिय’ असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम