शिवसैनिकांच्या घामाच्या कष्टातून मोठी झाली शिवसेना ; मुख्यमंत्री शिंदे !
दै. बातमीदार । २० जून २०२३ । राज्यातील शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जमलेल्या शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. भाषणाला सुरुवात करताच भाषण थांबवून त्यांनी आधी उपस्थित सर्वांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर भाषणाला सुरुवात केली.
आमच्यावरील आरोपाचे उत्तर आम्ही कामाने देणार, हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले, हेच आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवले. कितीतरी शिवसैनिकांच्या घामाच्या कष्टातून शिवसेना मोठी झाली आहे. या सर्वांची नावे या ठिकाणी घेतली गेली. मात्र, त्याच लोकांना हिनवण्याचे काम त्यांच्या वतीने सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
सत्तेसाठी स्वार्थासाठी खुर्चीसाठी तुम्ही गद्दारी केली. बाळासाहेबांचे विचार तोडले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, ज्या दिवशी तशी वेळ येईल, त्या दिवशी दुकान बंद करेल. तुम्हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन गद्दारी केली, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
आमच्यावर आरोप करून तुम्हाला सहनभूती मिळणार नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांना जनतेची सहनभूती मिळणार नाही. निवडणुका आपण भाजप- शिवसेना यांच्या सोबत युतीत लढवली होती. मात्र, तुम्ही त्यांनाच दूर करून काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत गेलात, असा आरोप देखील एकमेव शिंदे यांनी केला. असे असते तर एवढे शिवसैनिक, एवढे पदाधिकारी, आमदार, खासदार आमच्या सोबत आलेच नसते असा दावा देखील त्यांनी केला.
जो तुमच्या सोबत आहे तो चांगला, जो तुम्हाला सोडून गेला तो कचरा, असा आरोप तुम्ही करता. मात्र कालच आमच्या ताईंनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती होती हे दाखवून दिले आहे. मात्र असेच आरोप करत राहिलात तर एक दिवस तुमचा कचरा होण्याशिवाय राहणार नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूला आहे, हे सांगण्यासाठी किती आटापिटा करताय? सरकार पडणार- पडणार करत बसला मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आमच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांनी किती खोटारडेपणा केला आणि दिशाभूल केली. मात्र आता जनता त्यांना साथ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम