सिक्कीममधील पुरातील बळींचा आकडा वाढला १४३ बेपत्ता

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

सिक्कीम राज्यात ढगफुटीनंतर तिस्ता नदीला आलेल्या पुरात सापडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २५ झाली आहे. मृतांमध्ये सुरक्षा दलाच्या ७ जवानांचा समावेश आहे. अद्यापही १४३ लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी पहाटे ढगफुटी झाल्यानंतर तिस्ता नदीला पूर आला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून ४ लाख रुपये देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी केली.

बरदांग क्षेत्रातून बेपत्ता झालेल्या २३ जवानांपैकी ७ जणांचे मृतदेह वेगवेगळ्या भागात आढळून आले. मृत्युमुखी पडलेल्या ७ पैकी ४ जवानांची ओळख पटली असून, मृतांमध्ये बिन्नागुडी लष्करी छावणीतील गोपाल मद्दी, बेंगडुबी येथील ६४ ब्रिगेडचे नायक भवानीसिंह चौहान, अलीपूरद्वारच्या मधुबागानचे नायक एन. जी. प्रसाद व बिमल उरांव या जवानांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील क्षेत्रातील दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी, जलपायगुडी क्षेत्र तसेच कूचबिहार जिल्ह्यातील तिस्ता नदीपात्रात आढळून आले. बचाव अभियानादरम्यान ७ जवानांसह २५ जणांचे मृतदेह आढळून आले. या अभियानादरम्यान पुरात अडकलेल्या २,४१३ लोकांना वाचविण्यात यश आले. या पुराचा २५, १०० नागरिकांना फटका बसल्याचा दावा बचाव दलाच्या अधिकाऱ्याने केला आहे. राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाच्या मदत निधीतील केंद्राच्या वाट्यातून ४४.८ कोटी रुपये देण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम