सामाजिक कार्यकर्त्याची महिलांनी काढली धिंड !
दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ । राज्यात सुरु असलेल्या अवैध धंदे असो वा नियम डावलून जे कामे होत असतात त्याला नियमितपणे सामाजिक कार्यकर्ते असो वा माहिती अधिकार कार्यकर्ते हे विरोध करीत असतांना दिसून येत असते. पण कधी कधी अशा तक्रारी करणे या सामाजिक कार्यकर्त्यांना चांगलेच अंगाशी देखील येत असते. अशीच एक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घडली आहे.
काय आहे घटना
कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथील माजी सरपंच विनायक सोनवणे व सरपंच सना अस्लम शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याचा राग धरून सामाजिक कार्यकर्ते बापू शांताराम गवळी यांना १५ महिलांनी चपलांनी मारहाण करत धिंड काढून पोलिस ठाण्यात आणले. बापू गवळी यांच्या फिर्यादीवरून १५ महिलांवर कन्नड शहर ठाण्यात गुन्हे दाखल केले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी सांगितले की, आरटीई कार्यकर्ता बापू शांताराम गवळी (३४, रा. मक्रणपूर) यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. याच प्रकरणात मीराबाई रामलाल पवार (४० रा. मक्रणपूर) यांनी कन्नड शहर ठाण्यात फिर्याद दिली की, बापू शांताराम गवळी यास तू माझ्या नवऱ्याला का मारतो, असे विचारले असता, त्याने जातीवरून शिवीगाळ करून फिर्यादीचा उजवा हात पिरगळला. त्यामुळे बापू शांताराम गवळीविरुद्ध अॅट्रॉसिटीचा कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम