
राज्याचे मुख्यमंत्री गेले सुट्टीवर ; कारणही दिले !
दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ । राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षेनेते अजित पवारांनी वातावरण तापविल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या कारणास्तव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कर्मचार्यांना ते त्यांच्या गावी साताऱ्याला जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर असल्याची माहिती आहे. ३ दिवसांच्या सु्ट्टीत शिंदे त्यांच्या मुळ गावी साताऱ्याला गेले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्याही भूवय्या उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर जाण्याची अनेक कारणे चर्चेत आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल लवकरच येणार आहे. या निकालावर अनेक गोष्टी निर्भर आहेत. कारण जर निकाल शिंदेच्या बाजूने लागला तर राज्यात असलेले सरकार कायम असणार आहे. जर निकाल एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लागला तर शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे. तर निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देखील शिंदे देवाला साकडं घालण्यासाठी गेल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम