मंत्री मंडळाच्या बैठकीवरून ठाकरे गटाची जोरदार टीका !
बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३
राज्यातील शिंदे सरकारची छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार असून हि बैठक तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर होत असून बैठकीसाठी सरकारकडून मोठा खर्चही करण्यात आला आहे. सरकारच्या या कार्यक्रमावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर सडकून टीका केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या बॅनरवर हुतात्मांचे फोटो नाही तर ठगांचे फोटो लावले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच कार्यक्रमात मंत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण होत आहे.. असेही संजय राऊत म्हणाले. यावेळी बोलताना राऊत यांनी ही तीन ठगांची युती आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना वारेमाफ खर्च होत आहे. खाण्या- पिण्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. एक डाऊटफूल आणि दो हाफ सत्तेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, राज्य सरकारच्या कारभारावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही टीका करण्यात आली आहे. आठ महिन्यांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ६८५ शेतकरी फक्त मराठवाड्यातले आहेत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या काळातले हे चित्र विदारक आहे, मोदी हे स्वातंत्र्याचा अमृतकाल त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत… अशा शब्दात सामनामधून हल्लाबोल करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम