सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी : अजित पवार गटाला बसू शकतो धक्का !
बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३
राज्याच्या राजकारणात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आहे. तर आता शरद पवार गटाने अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे. चार महिन्यांपूर्वी शरद पवारांनी राज्यसभेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली असताना आता राष्ट्रवादीचे आणखी एक खासदार सुनिल तटकरे यांचे निलंबन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे.
सुनिल तटकरे हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत. तसेच राज्यात विधानसभा अध्यक्षांकडेही दोन्ही गटांनी आपलाच गट खरा पक्ष असल्याचे दावे करत एकमेकांच्या गटातील आमदारांवर कारवाईची मागणी केलेली आहे. यावरही सुनावणी सुरु आहे. असे असताना दोन-तीन महिन्यांनी सुप्रिया सुळे यांनी खासदार असलेल्या तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली होती. तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्यासमोर दाखल करावी, असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला होता. यानंतर आता सुळे या थेट लोकसभा अध्यक्षांकडे गेल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी पत्र दिले असून तटकरे यांच्यावर राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार तत्काळ निलंबनाची कारवाई करवी, त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केलेले आहे, अशी मागणी सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम