देशात पहिल्यांदा बस धावणार विजेवर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  देशातील पेट्रोल व डीझेलचे वाढत असलेले भाव लक्षात घेता विजेवर चालणारी बसची निर्मिती होण्याची तयारी सुरु असून त्यात दिल्ली ते जयपूरदरम्यान २२५ किलोमीटर मार्गावर येत्या ६ वर्षांत बस विजेवर धावतील. देशातील पहिला इलेक्ट्रिसिटी इनेबल्ड हायवे (विद्युतचलित महामार्ग) बनवण्याच्या दिशेने केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय काम करत आहे. यासाठी सध्याच्या मार्गावरच येणाऱ्या-जाणाऱ्या लेनवर एक डेडिकेटेड लेन विजेवर चालणाऱ्या बससाठी निश्चित केली जाईल. या बसचा वेग १०० किमीपर्यंत असेल. अशा ५५ आसनी बसचे प्रोटोटाइपही तयार होत आहे. दोन बस जोडून ९५ आसनी करण्यावरही काम सुरू आहे.

या इलेक्ट्रिक बस वेगळ्या असतात. अन्य इलेक्ट्रिक बस बॅटरीवर चालतात आणि त्यांना चार्जिंगची गरज असते. विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या बसमध्ये सतत वीजपुरवठा सुरू असतो. त्यामुळे या बसना चार्जिंगची गरज नसते. आता ज्याप्रमाणे रेल्वे किंवा मेट्रोमध्ये वीजपुरवठा केला जातो त्याचप्रमाणे या बस चालतील. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिक हायवेसाठी वेगळ्या रस्त्याची गरज नाही, एक डेडिकेटेड लेन असेल. या बसमध्ये तारांद्वारे वीजपुरवठा होईल. दुभाजकावर विजेचे खांब उभारले जाऊ शकतात. हा प्रकल्प बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर करण्याची योजना आहे. सूत्रांनुसार, प्रकल्पात टाटा आणि सीमेन्ससारख्या कंपन्यांना सहभागी केले जाईल. जर्मनीत प्रतिकिलोमीटर २२ कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिसिटी हायवे तयार झाला आहे. त्यामुळे तेथे ट्रकची वाहतूक जवळपास ६०% घटली आहे. स्वीडनने याचा वापर केला आहे. सध्या अनेक युरोपीय देशांमध्ये अशा प्रकारच्या बसचा वापर सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम