राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर जोरदार हालचाली सुरु !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राज्यातील राष्ट्रवादी पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वीच प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांनी निवड केल्यावर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेला उत आला होता. पण आता मध्यरात्री राज्यातील अनेक आमदारांसह पदाधिकाऱ्याना फोन करून बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आले असल्याची बातमी समोर अली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी ‘मला आता पक्षसंघटनेत काम द्या’ अशी जाहीरपणे मागणी करून प्रदेशाध्यक्ष पदावर शरद पवारांसमोरच दावा सांगितला होता. त्यादृष्टीने अजित पवारांनी आता जोरदार हाचलाली करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांनी आज आपल्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार समर्थक आमदार सकाळीच देवगिरीवर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी प्रमुख नेतेही देवगिरीवर हजर झाले असून सध्या बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मात्र या बैठकीला उपस्थित नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची भाकरी लवकर फिरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बैठकीत अजित पवार हे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर दावा करत आपली बाजू जोरदारपणे मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रातोरात फोन करून सकाळी लवकर मुंबईत पाचारण होण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे वृत्त सुत्रांनी दिले आहे.

राज्यात येत्या वर्षभरात लोकसभा, विधानसभा तसेच पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासासाठी तिकीट वाटपाचे सर्व अधिकार हे प्रदेशाध्यक्षांना असतात. जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, अजित पवार व जयंत पाटील यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लावत महाराष्ट्राची जबाबदारीदेखील सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी असले तरी पक्ष संघटनेत त्यांना फारसे अधिकार नाहीत, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत आगामी निवडणुकांत तिकीट वाटपासारखे इतर अधिकार मिळावेत, यासाठी अजित पवार यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच आता विरोधी पक्षनेतेपदाचे काम बस झाले, मला पक्षसंघटनेत एखादी जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम