मुख्यमंत्री जनतेचे नव्हे तर ; आदित्यचा शिंदे गटाला टोला !
दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ । आज मुंबईत गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री नाहीत, केवळ खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रात आम्ही रामराज्य आणणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मंगळवारी विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा बार उडवायला सरकार तयार असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळी मारली. त्यावरुन विधानसभेत अक्षरशः हास्याचे फवारे उडाले. आजही हाच विषय काढत लग्नाचे काही ठरले का?, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, तुमचे लग्न लावून देतो, असे सांगत काल देवेंद्र फडणवीसांनी मला राजकीय धमकी दिली होती. विधानसभेत कधीकधी अशा गमतीजमती होत असतात. त्यादृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे. आदित्य ठाकरे म्हणाले, आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यात सर्वत्र जल्लोष, उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह पाहायला मी गिरगाव येथे आलो आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी आज अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आधार देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल नाशिकमध्ये रात्री नुकसानीची पाहणी केली. रात्री अंधारात शेतीच्या नुकसानाची पाहणी केल्यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर आता टीका होत आहे. अंधारात अब्दुल सत्तार यांना काय दिसले, असा सवाल विरोधकांनी केला आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, सरकारकडून कर्तव्यात कसूर होत आहे. राज्यातील जनतेचे भले करण्यासाठी सरकार असते. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळालाच पाहीजे. मात्र, सरकारचे मंत्री केवळ दिखावा करण्यात व्यस्त आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम