१० दिवसापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा पहिला व्हिडिओ समोर

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेले ४१ कामगार सुखरूप असल्याचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सहा इंचाच्या पाइपलाइनद्वारे खिचडी पाठविण्यात आली असून, त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचे काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधत, बचाव अभियानाची माहिती घेतली. सर्व कामगारांना सुरक्षितपणे वाचवण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.

बोगद्यातून सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव अभियान राबवले जात आहे. अमेरिकन ऑगर मशीनद्वारे कामगारांना बाहेर काढण्यासाठी बनविण्यात येत असलेल्या मार्गाचे काम तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा दिल्लीहून आणण्यात आलेले एंडोस्कोपिक फ्लॅक्सी कॅमेरे बोगद्यात पाठविण्यात आले. यानंतर जारी करण्यात आलेल्या व्हिडिओत कामगार सुखरूप असल्याचे दिसून आले. पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आलेले भोजन हाती घेत कामगार एकमेकांशी संवाद साधताना दिसून आले. हे दृश्य पाहून कामगारांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोगद्याचा ढिगारा भेदून टाकण्यात आलेल्या ५३ मीटर लांब व सहा इंच व्यासाच्या पाइपलाइनद्वारे रात्री कामगारांना खिचडी पाठवण्यात आली होती.

पाइपलाइनद्वारे दाळ, खिचडी, कापलेले सफरचंद आणि केळी पाठवले जाऊ शकतात. कर्मचाऱ्याशी संपर्क ठेवण्यासाठी आतमध्ये एक वॉकीटॉकी आणि दोन चार्जर देखील पाठवण्यात आले आहेत. यापूर्वी चार इंचाच्या पाइपलाइनद्वारे कामगारांना अन्न-पाणी, औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाच आघाड्यांवर एकाच वेळी प्रयत्न केले जात आहेत. उभी ड्रिलिंग करणे आव्हानात्मक ठरत असल्याने आता क्षैतिज ड्रिलवर लक्ष केंद्रित केले जात आहे. अशा प्रकारचे ड्रिलिंग करणे दुसरा सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम