सत्ताधारी पक्षात होणार भूकंप ; पवारांचे ट्वीट चर्चेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदेंनी नवा गट तयार करीत भाजपसोबत येत सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेना कुणाची याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतांना दोन दिवस नियमित सुनावणी सुरु झाल्यानंतर आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवणार की नाही याबद्दल आज निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान झालेला युक्तिवाद पाहता शिंदे गट आणि भाजपा आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सूचक ट्वीट करत हा दावा केला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट केलं असून सत्ताधारी पक्षात भूकंप येण्याची शक्यताच वर्तवली आहे. आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून त्यांची बॉडी लँग्वेज पडलेली दिसत होती असं रोहित पवार म्हणाले आहेत. अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फाईल्स मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. रोहित पवारांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

रोहित पवारांच्या ट्वीटमध्ये काय?
“भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती,” असा दावा रोहित पवारांनी ट्वीटमधून केला आहे.

“सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फाईल्स मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?,” अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम