मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच ; आमदाराच्या घराला लावली आग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  देशातील मणिपूरमध्ये गेल्या ३ मेपासून सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री 5 वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या घटना घडल्या. इंफाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर शेकडोंच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सुरक्षा दलांनी जमावाला पळवून लावले.

दुसऱ्या एका घटनेत भाजप आमदार विश्वजित यांच्या घराला जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केला. मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स टीमने तो प्रयत्न हाणून पाडला. तिसरी घटना सिंजेमाईची आहे. इथे जमावाने भाजप कार्यालयाला घेराव घातला, मात्र लष्कराच्या जवानांनी गर्दी पांगवली. चौथ्या घटनेत शुक्रवारी रात्री उशिरा राजधानी इंफाळमधील पोरमपेटजवळ भाजपच्या महिला अध्यक्षा शारदा देवी यांच्या घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न जमावाने केला. सुरक्षा दलांनी तरुणांना पळवून लावले.

पाचवी घटना राजधानी इंफाळमधील प्रसिद्ध पॅलेस कंपाऊंडची आहे. सुमारे 1,000 लोकांचा जमाव कंपाऊंड जाळण्यासाठी आला होता, परंतु RAF जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्या झाडल्या, त्यानंतर जमाव निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा बिष्णूपूर जिल्ह्यातील क्वाकटा आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवाईमध्ये ऑटोमॅटिक शस्त्रांनी गोळीबार झाला. लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्सने राजधानी इंफाळमध्ये मध्यरात्रीपर्यंत संयुक्त मार्च केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम