आपल्याला मरायचे नाही तर लढायचे आहे ; मनोज जरांगे पाटील !
बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय जोरदार चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या महिन्याभरापासून राज्यभर दौरे व सभा करीत आहे पण गेल्या दोन-तीन दिवसांत मराठा आरक्षणासाठी जवळपास चार तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यावर आत्महत्या केल्याने न्याय मिळणार नाही. कुणीही आत्महत्या करु नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच, आपल्याला मरायचे नाही, लढायचे आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यापूर्वी मराठा आरक्षणासाठीच्या लढाईची पुढील दिशा काय असणार? हे आज मनोज जरांगे आंतरवाली सराटी येथे स्पष्ट करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाज आत्महत्या करणारा नाही. तरुणांनी आत्महत्या करू नये. आत्महत्या केल्याने न्याय मिळणार नाही. उलट आपलाच एक माणूस कमी होत आहे. लढाईसाठी आपली माणसे वाढली पाहिजे. शक्ती वाढली पाहिजे. ती कमी होता कामा नये. त्यामुळे आपण लढू. पुन्हा सांगतो आपण लढू. समाजाला न्याय द्यायचा आहे. मराठा समाजातील तरुणांना उद्देशून मनोज जरांगे पाटील म्हणाले, आत्महत्या केल्याने तुमचेच कुटुंब उघडे पडेल. कोणीही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देणार नाही. आईवडील मुलंबाळांकडे नंतर कोणी पाहत नाही. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांच्या रक्ताचे वंशज आहोत. आपल्याला लढायचे आहे. मरायचे नाही. एकानेही आत्महत्या करायची नाही म्हणजे नाही, असे जरांगे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम