आम्हांला विचारणं बंद केलंय ; बच्चू कडूंनी सरकारवर टीका !
दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ । राज्यात एका पाठोपाठ दुसरा महाभूकंप जनतेला बघायाल मिळाला असतांना २०१९मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हा प्रयोग झाल्यानंतर, शिंदे-भाजप हा प्रयोग झाला. आता अजित पवार भाजपच्या सोबत आल्याने एक निराळा प्रयोग महाराष्ट्राला बघायला मिळतो आहे.
या सत्तेच्या गदारोळात आमदार बच्चू कडू यांची चांगलीच गोची झाली आहे. ज्या बच्चू कडूंना महाविकास आघाडी सरकारने मंत्रिपद दिलं होतं, त्या बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी होत नव्या सरकारमध्ये जाणं पसंत केलं. परंतु त्यांना नंतर मंत्रिपद मिळालं नाही. शिंदे सरकारने बच्चू कडूंसाठी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली परंतु कडूंना मंत्रिपदाची शपथ दिलेली नाही. शिंदे गटातले आमदार मंत्रिमंडळ विस्तारासाठी देव पाण्यात ठेवून बसलेले असतांनाच अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला.
या सगळ्या गदारोळात आमदार बच्चू कडूंचे चांगलेच हाल झाले. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. भाजपबद्दल बोलतांना कडू म्हणाले की, संख्या वाढत चालली म्हणून आम्हांला विचारणं बंद केलंय, परंतु हे योग्य नाही. आम्हाला कसलीही कल्पना न देता अजित पवारांचा शपथविधी झाला. भाजपला साथ देणं चुकीचं ठरलं आहे, अशी थेट नाराजी त्यांनी व्यक्त केली. कडू पुढे म्हणाले की, सरकारमधील मंत्र्यांपेक्षा आमदारांची गोची सुरु आहे. राष्ट्रवादीने, अजित पवारांनी निधी दिला नाही, असं म्हणून शिंदे गट वेगळा झाला आणि आता त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहे. आता अजित पवार हे आता आमचा निधी खेचणार. परंतु या निर्णयामुळे भाजपचं जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे, असा रोष त्यांनी व्यक्त केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम