डॉ. सुभाष भामरेंना मिळालेल्या संधीचे सोने होईल का?; काँग्रेसकडे ताकदीचा उमेदवार नसल्याची जोरदार चर्चा
दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भारतीय जनता पार्टीने गेल्या तीन निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळालेला मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ. भाजपने मतदारसंघात सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.
त्यामुळे खासदारकीची हॅटट्रिक करण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. पण दुसरीकडे महाविकास आघाडीतली परिस्थिती अजून पर्यंत याच्या पूर्ण उलट असल्याचे दिसत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे. पण काँग्रेसने अजून प्रयंत उमेदवारीच जाहीर केलेला नाही. यामुळे काँग्रेसकडे ताकदीचा उमेदवार नसल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.
मुस्लीम मतदारांची संख्या आणि एमआयएमची शक्ती यामुळे एमआयएम येथे काय भूमिका घेणार त्याकडेही लक्ष लागलेले आहे. त्याचाही निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नाशिक आणि धुळे दोन जिल्ह्याचा भाग या मतदारसंघांच्या अंतर्गत येतो. तसेच बहुजन, आदिवासी, मुस्लीम अशा संमिश्र मतदारांचा प्रभाव असल्यानं या मतदारसंघाच्या निकालांकडे लक्ष लागलेले असते.
धुळे मतदारसंघात विद्यमान भाजपचा खासदार असला तरी धुळे मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनेही तयारी सुरू असल्याच्या चर्चा होत्या. दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे या मतदारसंघातून खासदारकीची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत होते. अविष्कार भुसे यांनी मतदारसंघात प्रचंड जनसंपर्क वाढवल्याचे पाहायला मिळाले. अविष्कार भुसे यांचे काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये भावी खासदार असे पोस्टर देखील बघायला मिळाले होते.
२००९ मध्ये भाजपकडून प्रताप सोनवणे यांना इथून उमेदवारी दिली. त्यांना अमरीश पटेलांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर २०१४ मध्ये सुभाष भामरेंना इथून संधी मिळाली. त्यांना सलग दोन वेळा विजय मिळवत इथले भाजपचे वर्चस्व कायम ठेवले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम