भररस्त्यात गोळीबार! मुक्ताईनगरचा तरुण गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

भररस्त्यात गोळीबार! मुक्ताईनगरचा तरुण गंभीर जखमी

लोखंडी रॉडने वार करून गावठी कट्ट्यातून झाडल्या गोळ्या; हल्लेखोर पसार

वरणगाव (प्रतिनिधी): वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी सायंकाळी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी मुक्ताईनगर येथील रहिवासी सरफराज सय्यद बशीर सय्यद (वय २५) याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी सरफराजवर प्रथम लोखंडी रॉडने हल्ला चढवला आणि त्यानंतर गावठी कट्ट्यातून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात खांद्याला गोळी लागल्याने आणि डोक्याला जबर दुखापत झाल्याने सरफराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरफराज हा भुसावळ येथील बी. एन. अग्रवाल यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत आहे. रविवारी सायंकाळी काम आटोपून तो दुचाकीने घराकडे निघाल्यानंतर त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर नेहमीचा रस्ता सोडून तो फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपासने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला अचानक गाठले. संशयितांनी आधी त्याच्या डोक्यावर रॉड मारला आणि नंतर थेट गोळीबार केला.

गोळी लागताच सरफराज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तर संधी साधून तिन्ही हल्लेखोर दुचाकीवरून सुसाट पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमीला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम