दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात

बातमी शेअर करा...

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात

प्रतिनिधी | भुसावळ चालू वर्षातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वरणगाव परिसरातील बळिराजाला मदतीचा हात देण्यासाठी ‘वासुदेव नेत्रालया’ने एक अत्यंत स्तुत्य आणि भावनिक पाऊल उचलले आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी नेत्रालयाच्या वतीने १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या महिन्याभराच्या कालावधीत मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे.

महाराष्ट्र दुष्काळाच्या चक्रव्युहात होरपळत असून शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहेत. अशा कठीण परिस्थितीत पैशांअभावी शेतकरी आपल्या आरोग्याकडे, विशेषतः डोळ्यांच्या आजारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. शेतकर्‍यांची हीच मूक वेदना ओळखून वासुदेव नेत्रालयाच्या संचालिका डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नी. तु पाटील यांनी या सामाजिक महायज्ञाची सुरुवात केली आहे. १ ते ३० नोव्हेंबर या महिन्याभराच्या कालावधीत केवळ शेतकरी असलेल्या व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे.

या योजनेचा केवळ शेतकर्‍यांना लाभ मिळेल, वासुदेव नेत्रालय वरणगाव येथे शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व सेवेची संधी द्यावी असे आवाहन डॉ. नी.तू. पाटील व डॉ. रेणूका पाटील यांनी केले आहे.

वासुदेव नेत्रालयाने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. निवडणुकीत मतदारांना विशेष सवलत देणे, प्रिस्क्रिप्शनवर समाजप्रबोधन संदेश छापणे आणि विविध धार्मिक-सामाजिक उपक्रम राबवणे यांद्वारे नेत्रालयाने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुष्काळाच्या या कठीण काळात बळिराजाला नवसंजीवनी देणारे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे.

ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो, ज्याच्यामुळे आपल्याला नाव आणि ऐश्वर्य मिळाले, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच भावनेतून दुष्काळात होरपळणार्‍या शेतकरी बांधवांसाठी हा मदतीचा हात पुढे केला आहे, निसर्गाने पाठ फिरवली तरी आम्ही शेतकर्‍यांना आमच्या परिने साथ देवू, अशी भावना डॉ. रेणूका पाटील, डॉ. नी. तु. पाटील यांनी व्यक्त केली. खचून न जाता या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्रालयाने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम