
आयपीएलचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स !
दै. बातमीदार । १४ मे २०२३ । देशात सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये आज पुन्हा एकदा डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल, जो जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. दिवसाचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होईल, जो चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.
जयपूरमध्ये राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. यातील चार सामने राजस्थानने आणि तीन सामने बंगळुरूने जिंकले आहेत, तर राजस्थानविरुद्ध बंगळुरूने गेल्या 10 वर्षांपासून या मैदानावर विजय मिळवला नाही. 2013 साली बंगळुरूने येथे शेवटचा विजय मिळवला होता.
राजस्थानने या मोसमात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 6 जिंकले आहेत आणि तेवढेच सामने गमावले आहेत. संघाचे सध्या 12 गुण आहेत. बेंगळुरूविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू जॉस बटलर, जो रूट, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट असू शकतात. याशिवाय यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी बंगळुरूने 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. राजस्थानविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि जोश हेझलवूड असू शकतात. याशिवाय विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल या मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम