
नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे स्टार्ट अपद्वारे नवीन उद्योजक उदयास – डॉ.विकास गिते
रोटरी वेस्ट तर्फे चर्चासत्र
दैनिक बातमीदार | 22 मे 2022 | जळगाव येथे उद्योग-व्यवसायासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना असतील तर कोणीही सामान्य कुटुंबातील व्यक्तीही स्टार्ट अपच्या माध्यामातून उद्योजक होऊ शकतो असे प्रतिपादन क.ब.चौ.उमविच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशनचे संचालक डॉ. विकास गिते यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा, इनक्युबेशन सेंटरचे सीईओ मानवीन चढ्ढा, व्यवस्थापक निखील कुलकर्णी, संचालक छबीराज राणे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. गिते यांनी विद्यापिठाच्या या सेंटर तर्फे उद्योग-व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना जागा, तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य, साधने, सुविधा यासह तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. यासाठी वयाचे, भाषेचे, रहिवास क्षेत्राचे असे कुठलेही बंधन नसून, नाविन्यपुर्ण व बाजारपेठेत प्रतिसाद मिळेल अशा संकल्पना, संशोधन असणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाच्या सेंटरमधुन स्टार्टअपद्वारे उद्योजक झालेल्या विद्यार्थ्याने अनुभव कथन केले. चर्चेत माजी अध्यक्ष विनोद बियाणी, चंद्रकात सतरा, जखोटीया यांनी सहभाग घेतला. आभार माजी अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार राणे यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम