या कारणासाठी ठाकरेंनी दिला होता राजीनामा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल गुरुवारी समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. या निकालावर उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केले आहे.

नैतिकतेला धरुन मी राजीनामा दिला. आता बेकायदेशीर सरकारने आपला राजीनामा द्यावा. आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाऊयात. जनता सर्वोच्च आहे. त्यांचा कौल स्विकारुया, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आज सकाळी रस्ता चुकल्यासारखे वाटत असेल. मी आज शिर्डीला जात आहे. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा जो काही प्रकार सुरु आहे. त्याला कुठेतरी चाप बसायला हवा. यावर सविस्तर बोलण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी जपलेली शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून दावणीला बांधली ती भाजपने. काल काहींनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपला डोईजड झालेले ओझे उतरवण्याचा मार्ग मिळाला म्हणून त्यांनी आनंद साजरा केला. मात्र गद्दारांनी का आनंदोत्सव साजरा केला, हे कळलेले नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सरळ सांगितले आहे की पोपट मेलेला आहे. आता ते जाहिर करण्याचे काम अध्यक्षांवर सोपवले आहे. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना आवाहन करेल की, देशात अशाप्रकारचा नंगानाच सुरु असून यातून आपली देखील बदनामी होत आहे. त्यांना चाप लावा. हिंदुत्वाचे धिंडवडे निघू नये.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम