मशालीनेच शिवसेनेचा इतिहास घडला होता ; आता पुन्हा घडणार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ । ठाकरे गटाला नुकतेच निवडणूक आयोगाने धगधगती मशाल दिली आहे. पण याच मशालीने स्व.बाळासाहेबांनी राजकीय निवडणूक प्रथमच याच चिन्हावर लढविली असल्याने पुन्हा तोच जोश घेत ठाकरे गट आता मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे वातावरण राज्यात निर्माण ठाकरे गटाने केले आहे.

मशाल चिन्हावर निवडून आले पहिले नगरसेवक व आमदार
एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. मशाल चिन्हावरतीच छगन भुजबळांनी विजय मिळवला होता. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीसाठी उभे करण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली.

1985 साली दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळीदेखील शिवसेनेचे चिन्ह होते धगधगती मशाल. या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आली. मुंबई पालिकेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलले व शिवसेना राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. 1989 लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर खासदार झाले होते. म्हणजेच मशाल चिन्हावर यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवकांपासून आमदार, खासदारही निवडून आले आहेत, असे म्हणता येईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धगधगती मशाल’ ही नवी निशाणी दिल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी शेकडो शिवसैनिक धगधगती मशाल हाती घेऊन रस्त्यावर उतरले. उस्मानाबादमधील ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शहरात धगधगत्या मशालीच्या प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. सध्या सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले जुने व्यंगचित्र व्हायरल होत आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीच हे व्यंगचित्र ट्विट केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1984 मध्ये हे व्यंगचित्र काढले होते. “कमळ दिलं त्यावेळी सुखावलात आता मशालीची धग सहन करा” अशा इशारा त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपाला दिला होता. आता ठाकरे गटाचे नेतेही या व्यगंचित्राच्या माध्यमातून भाजप व शिंदे गटावर निशाणा साधत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम