
रावेर ला ४६ झाडांची अवैध कत्तल ; लाकूड माफीयांचा सुळसुळाट
के-हाळा पिंप्री शिवारात अवैध विनापरवाना ४६ वृक्षांची कत्तल
रावेर – विजय पाटील
तालुक्यात लाकूड माफीयांचा सुळसुळाट झालेला असून अवैध वृक्षतोड ची सीमा ओलांडली गेली आहे.
येथून जवळच असलेल्या के-हाळे पिंप्री शिवारात लाकूड माफीयांचा सुळसुळाट झालेला असल्याने
त्या ठिकाणी वृक्षांची कत्तल केली जात आहे. पिंपरी मंगरूळ फाट्यावर अवैध वृक्षांचे सुमारे 46 झाडांचे कत्तल केले गेलेले आहे. या वृक्षतोडीचे कुठलेही मूल्यांकन नसतांना व कुठलीही परवानगी घेतलेली नसताना ही अवैध वृक्षतोड केलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत के-हाळे कक्ष येथे नवीन ३३/११ के.व्हि.उपकेंद्राचे बांधकाम सुरु असून बांधकामास अडथळा आणणा-या व धोकादायक वृक्षांना तोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महावितरण के-हाळे कक्षाचे सहाय्यक अभियंता यांनी दि. २० जुलै २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रावेर यांचेकडे केली होती. त्यानुसार उपविभागीय कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रावेर यांनी दि. २८ सप्टेबर २०२६ रोजी वन परिक्षेत्र अधिकारी, वन परिक्षेत्र कार्यालय, रावेर यांना के-हाळे पिंप्री अहिरवाडी कर्जोद वाघोड मोरगाव नेहेते प्रजिमा-७१ यावरील झाडांचे मुल्यांकन मिळणे बाबत पत्र दिले होते. परंतु अद्यापही वन परिक्षेत्र अधिकारी, वन परिक्षेत्र कार्यालय, रावेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मुल्यांकन सादर केलेले नाही.
याबाबत वनविभागाच्या अहिरवाडी विभागाच्या वनपाल सौ. अरुणा ढेपले यांच्या कडे दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि , त्या लाकूड तोडी बाबतची परवानगी उद्या मिळणार आहे.
म्हणून असा प्रश्न उपस्थित होतो कि , परवानगी पूर्वी किंवा परवानगी नसतांना दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी एवढी ४६ झाडे तोडली कशी. यामागे वन विभागाचे अर्थपूर्ण संबंध असल्यानेच हि एवढी वृक्ष तोड झालेली आहे.
तरी प्रशासनाने याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अशी नागरिकांची मागणी होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम