आ. लताताई सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच; हायकोर्टाचा निकाल कायम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 10 सप्टेंबर 2022 | चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल, सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली आहे. जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे.

दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सौ. सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती.

माजी आमदारांनी केली तक्रार

आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती.

काय आहे प्रकरण?

लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या असून माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते.

उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे – जगदीश वळवी

आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस व मागणी आहे. तसेच विधानसभेत दोन नंबरचे मत असणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करावे. अशी मागणी याचिकाकर्ते माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम