समृद्धी महामार्गावर इतके असेल बस तिकीट तर ज्येष्ठ नागरिकांना सवलत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर येत्या गुरूवार १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी नाॅन एसी बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

विना थांबा असलेली ही शयनयान बस नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानकावरून रात्री ९ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता शिर्डीला पोहोचेल. बसचे भाडे १३०० रूपये राहिल, असे विभाग नियंत्रकांनी कळवले आहे. या बसमध्येही ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ६५ वर्षावरील नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल). निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर. याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी) मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण २० नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे ९०० रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम