
अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान होण्याची चिन्हे !
दै. बातमीदार । १५ डिसेंबर २०२२ । राज्यात काही दिवसापासून थंडीचा जोर कमी झाल्याने काही भागात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. राज्याच्या विविध भागात बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूरसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत.
दरम्यान, आज राज्यभरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. आजपासून राज्यात कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमान 16.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान 16 ते 26 अंशांच्या दरम्यान आहे. याशिवाय पुण्यात नीचांकी तापमान 18.3, जळगावमध्ये 21.7, धुळे 19, कोल्हापूर 21, नाशिक 20.8, औरंगाबाद 18, नांदेड 21.2, उस्मानाबाद 19, परभणी 20.6, अकोला 22.6, अमरावती 20.3, बुलडाणा 21.4, निफाड 21.5, सांगली 21.3, सातारा 16.1, सोलापूर 20.5 अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले गेले आहे.
औरंगाबादेत मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. याशिवाय वाशिममध्येही रात्री उशिरा पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. कापसाची बोंडे आता पूर्ण भरली असून ती आता केवळ काढण्याचीच प्रतीक्षा आहे. अशात अवकाळी पावसामुळे कापूस ओला होऊन खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. येथील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याशिवाय नाशिक, बदलापूर, कोकण येथेही जोरदार पाऊस बरसला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम