ठाकरे गटाच्या महिला नेत्याच्या कानशिलात दोन लगावल्या ?
दै. बातमीदार । १९ मे २०२३ । राज्यातील ठाकरे गट सध्या भाजप व शिंदे गटाला निशाण्यावर धरत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र करीत असल्याचे गेल्या काही महिन्यापासून दिसत आहे. तर आता ठाकरे गटातील नेत्या व पदाधिकारीमध्ये वाद पेटल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
बीड शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून ‘होय, मी सुषमा अंधारेंच्या दोन कानशिलात लगावल्या, त्या कार्यकर्त्यांकडून पैसे मागत आहेत, माझे पद विक्री करायला निघाल्या आहेत,’ असा आरोप केला. अंधारे यांनी मात्र मारहाणीचा दावा फेटाळला आहे. बीडमध्ये २० मे रोजी शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची ग्रामीण महाराष्ट्राची समारोप सभा आहे. खा. संजय राऊत, सुषमा अंधारे यांची या सभेला उपस्थिती असणार आहे. याची तयारी सध्या सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सुषमा अंधारे या सभेच्या मैदानाची व तयारीची पाहणी करत असताना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व अंधारे यांच्यात वाद झाला. स्वतः जाधव यांनी याबाबत एक व्हिडिओ केला आहे.
जाधव म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून विविध वस्तू मागत आहेत. त्यांच्या परळीतील कार्यालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी लेकराबाळाच्या तोंडातला घास काढून त्यांना विविध वस्तू दिल्या. आम्ही काही देण्यास नकार दिला की आमचे निगेटिव्ह वार्तांकन उद्धव साहेबांकडे करीत होत्या. यासंदर्भात मी स्वतः उद्धव साहेबांना थेट बोललो. त्यांच्या अशा वागणुकीच्या तक्रारीदेखील केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा प्रकार सुरूच होता. आज सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो त्या वेळी अंधारे यांना मी बाजूला घेऊन या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना मी म्हणालो, तुम्ही असे पैसे घेऊन किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का पदे वाटत आहात? त्यावरून त्यांची आणि माझी बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी त्यांच्या कानाखाली ठेवून दिली. या प्रकारानंतर अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यातही बाचाबाची झाली. त्यात वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ गाडी फोडली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम