
‘तुम्ही माझी साथ द्या, मी हिंदू राष्ट्र बनवून दाखवेन’ ; पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री
दै. बातमीदार । २४ जानेवारी २०२३ । देशात गेल्या काही दिवसापासून बागेश्वर धामच्या मोठ्या चर्चेत आले होते तर नागपुरात अंधश्रद्धा निर्मुलन समितीसोबतच्या वादामुळे आणखी चर्चेत आलेल्या बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची वल्गना केली आहे. रायपूरच्या गुढियारी भागात सुरू असणाऱ्या रामकथेत त्यांनी हे विधान केले. 17 ते 23 जानेवारीपर्यंत झालेल्या या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी जमली होती. त्यानंतर समारोप सोहळ्यात व्यासपीठावरून त्यांनी भारताचे हिंदू राष्ट्रात रुपांतर करण्याचे विधान केले.
सर्वप्रथम पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण केले. ते म्हणाले – ‘भारताचे वीर सुपुत्र सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ असा नारा दिला होता. मी आज नवा नारा देत आहे ‘तुम्ही माझी साथ द्या, मी हिंदू राष्ट्र बनवून दाखवेन’. भारतीय नागरिकांनी बांगड्या भरून घरात बसू नका.’ त्यांचे हे बोल ऐकताच मंचासमोरील नागरिकांनी जय श्रीरामची नारेबाजी केली. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले – आज लोकांनी माझ्याकडे बोट दाखवले. भविष्यात सर्वच सनातन्यांविरोधात असे करतील. आता तुम्ही घराबाहेर पडला नाही तर तुम्हाला डरपोक मानले जाईल. भारतात बोट न दाखवलेला एकही व्यक्ती नाही. सर्वच लोकांना कसोटीवर खरे उतरावे लागले आहे.
लोक मला विचारतात चमत्कार काय आहे. आज हिंदू जागा झाला हाच पहिला चमत्कार आहे. दुसरा चमत्कार पहायचा असेल तर दरबारात या. तिसरा चमत्कार हा आहे की, तुम्ही प्रार्थना निष्फळ ठरू देऊ नका. मला राजकारणी बनायचे नाही. मला कोणत्या पक्षातही जायचे नाही. गत 17 जानेवारी रोजी रायपूरमध्ये पंडित धीरेंद्र महाराज रामकथेसाठी पोहोचले होते. हा कार्यक्रम 23 जानेवारीपर्यंत शहराच्या गुढियारी भागात झाला. धीरेंद्र शास्त्रींवर नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप केला होता. हा वाद चिघळल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी वाढली आहे. 20 व 21 जानेवारी रोजी त्यांच्या कार्यक्रमाला 4 लाखांहून अधिकची गर्दी झाली. शास्त्रींनी गर्दीतून लोकांना बोलावून त्यांची माहिती कुणालाही न विचारता कागदावर लिहिली. तसेच आपल्याला यापूर्वी याची माहिती नसल्याचेही सांगितले. मी संत असल्याचा दावा केव्हाच केला नाही. मी एक साधारण व्यक्ती आहे, असे ते म्हणाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम