भाजपला मोठा धक्का : माजी मुख्यमंत्री पुत्र कॉंग्रेसमध्ये होणार दाखल !
दै. बातमीदार । ६ मे २०२३ । देशात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सध्या तरी आहे. पण अनेक राज्यातील दिग्गज नेते भाजप पक्षाला सोडून कॉंग्रेसची वाट धरीत आहेत. अशातच भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणारा मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. याच दरम्यान, मध्यप्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपुत्र दीपक जोशी यांनी भाजपाला धक्का देत सोडचिठ्ठी देत त्यांनी आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
गेल्या काही काळातील घडामोडींमुळे माझ्या वडिलांच्या अस्मितेला धक्का बसला आहे. मी आता त्यांचं स्वप्न काँग्रेसमध्ये जाऊन पूर्ण करेन. माझ्या वडिलांनी सुचितेचं राजकारण केलं. मात्र आता भाजपाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. बागलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे मला वाईट वाटले आहे. मी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपाच्या सर्व नेत्यांसोबत माझी चर्चा झाली आहे. मात्र मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी अखेपर्यंत लढत राहीन, असे दीपक जोशी यांनी सांगितले.
माजी मंत्री असलेल्या दीपक जोशी यांनी ५ मे रोजी देवास येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, निश्चित वेळेनुसार मी माझ्या वडिलांची तसबीर घेऊन भोपाळला जाईन. माझा वारसा माझ्या हातात आहे. माझी चौथी-पाचवी पिढी भाजपासोबत काम करत आहे. भाजपाला माझ्या निर्णयामुळे वाईट वाटेल. मात्र कुटुंबाला वाचवण्यासाठी मी ही लढाई लढत आहे, असे त्यांनी सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम