मरेपर्यंत शिवसैनिक राहणार ; उद्धव ठाकरेंना या आमदाराने दिला शब्द
दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । सरकार कोसळलं, इतकंच नाही तर अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं चिन्ह आणि नावही गोठवलं गेलं. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन साळवी यांनी मात्र आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहाणार असल्याचं सांगत शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राजन साळवी यावेळी बोलताना म्हणाले, की माझी निष्ठा बाळासाहेब यांच्या चरणाशी आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहील आणि कुठेही जाणार नाही. उदय सामंत यांना टोला लगावताना राजन साळवी म्हणाले, की काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून अशा चर्चा केल्या जात आहेत. माझी सुरक्षा काढल्यास शिवसैनिक माझी काळजी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा दबक्या आवजात काही दिवसांपासून सुरू होती, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी शेवटच्या क्षणापर्यंत राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करणार आहे. मी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, असं साळवी यांनी स्पष्ट केलं. मात्र, पक्षप्रमुख जो उमेदवार देणार त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम