माऊलींच्या पालखीचं जेजुरीत टाळ-मृदुंगाचा गजरात आगमन !

बातमी शेअर करा...

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत काल १६ जून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत करण्यात आले. सासवडहून सकाळी पंढरपुरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा जेजुरीजवळ आला. यावेळी लांबूनच खंडोबाचा गड दिसू लागताच वारकर्‍यांच्या आनंदाला उधाण आले. दिंड्यांमधील वारकर्‍यांच्या टाळ-मृदुंगाचा आवाज वाढला. विठूनामाच्या गजराबरोबरच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष सुरु झाला. दिंड्यातील वारकरी नाचू लागले. विविध भारुडे, पदे, अभंग दिंड्यातून ऐकायला येऊ लागली.

“‘अहं वाघ्या, सोहम वाघ्या प्रेमनगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी’, असे अभंग म्हणत वारकर्‍यांनी देवाच्या दारात मल्हारी वारी मागितली. अठरापगड जातींचं श्रद्धास्थान असलेला खंडोबा व पंढरीचा विठोबा या दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले.

ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपानकाकांच्या सासवड नगरीतून रविवारी सकाळी पालखीने जेजुरीकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवले. वाटेत बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सासवड ते जेजुरी हा १७ कि.मी चा टप्पा पार केला. सोहळ्याने सायंकाळी पाच वाजता जेजुरी नगरीत प्रवेश केला.
यावेळी पालखीवर पिवळ्याधमक भंडार्‍याची मुक्त उधळण करण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता पालखी सोहळा ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी असलेल्या पालखी तळावर पोहचला. तेथे समाज आरती करण्यात आली. दररोज खंडोबाला येणार्‍या भाविकांमध्ये गुंतलेली सारी जेजुरी नगरी आज मात्र वारकरी बांधवांचे आदरातीथ्य व सेवा करण्यात व्यस्त होती. गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गावामध्ये चिंचेची बाग, छत्री मंदिर, लवथळेश्वर, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तंबू उभारून वारकरी दिंडय़ा उतरल्या होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम