अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे ; राज ठाकरे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून एका महिलेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात मुंबईमधील तृप्ती देवरुखकर नामक मराठी तरुणीला व्यवसायासाठी जागा नाकारण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दट्ट्यानंतर या तरुणीला जागा नाकारणाऱ्या इमारतीच्या सचिवांनी माफी मागितली. पण आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना अन्याय दिसेल तिथे लाथ घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच घर नाकारणाऱ्यांनाही गालावर वळ उठण्याचा इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. राज ठाकरे पुढे म्हणाले की, हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम