
अण्णासाहेब पाटलांनी काढली पवारांची पदवी !
दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ । राज्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना जाणता राजा ही पदवी दिली जाते. मात्र, ते कुठे लढायला गेले होते, अशी खोचक टीका करत कार्यकर्त्यांनीही नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अवमानकारक भाष्य करणं अयोग्य आहे. शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं. पाटील म्हणाले, ‘‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात काही प्रमाणात समन्वय कमी असल्याने व्याज परताव्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता व्याज परताव्याची प्रकरणे निकालात काढून ती शून्य टक्क्यावर आणली जाणार आहेत. महामंडळाची जबाबदारी २०१८ पासून माझ्याकडे आली असून, या कालावधीत तीन हजार ५०० कोटींचे कर्जवाटप व ५० हजार लाभार्थी जोडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन हजार २०० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतील बहुतांश लाभार्थी परतावा करत असल्याने विविध बँका स्वागत करत आहेत.
दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी योजनेतही सकारात्मक बदल घडविण्यात येणार आहेत. आर्थिक महामंडळाच्या योजनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विचार सुरू असून, याबाबत बैठकही झाली आहे. याचबरोबर महामंडळाच्या योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची संख्या वाढविण्यात येणार असून, येत्या काही वर्षांत एक लाख मराठा उद्योजक तयार करणार आहे.’’

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम