“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही”, लोकनेते एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा
दै. बातमीदार । १२ मे २०२४ । महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भारतीय जनता पार्टीत जाणार आहेत. महिन्याभरापूर्वीच खडसेंनी याबाबत माहिती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे त्यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे. तसेच, खडसें यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक हरलेल्या रोहिणी खडसे २०२० मध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. एकनाथ खडसे यांनी ४० वर्षांचे भारतीय जनता पार्टी बरोबरचे ऋणानुबंध तोडून शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. मात्र, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचे कारण देत खडसेंनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. येत्या काही काळात त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश होईल. मात्र, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.
आचारसंहिता काळात पिंपरी-चिंचवड ग्रामीण भागात १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
याबाबत खडसे म्हणाले, मी ज्यावेळी भाजपात जायचे ठरवले तेव्हा मी रोहिणीताईंनाही सांगितले की माझ्याबरोबर भाजपात चला. मात्र, रोहिणीताईंनी सांगितले की मी शरद पवारांबरोबरच राहु इच्छिते. गेले काही वर्षे मी येथे काम करते आहे. मला इथे मान सन्मान दिला आहे. आणि मला त्यांचे तत्व आवडतात. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहीन. मला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भवितव्य आहे, असे तिला वाटते. म्हणून तिने भाजपात माझ्याबरोबर येण्यास नकार दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शरद पवार देखील रोहिणी खडसेंना संधी देतील, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बाप-लेकीत हा सामना रंगू शकतो. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, “रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपात प्रवेश केला तर भाजपाचंच काम करणार. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी मला सांगितले की मी दिलेली वस्तू परत घेत नाही. शरद पवारांनीच मला अभय दिले असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही.”
“…तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकीय माणूस आहे. पण आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही”, असे देखील खडसेंनी पुढे स्पष्ट केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम